Sitemap
Premaredkar

Premaredkar

4 min read17 hours ago

--

नामदेव ढसाळ : विद्रोहाची धगधगती कविता

विद्रोहाचा आवाज

दलित पँथरचे निर्माते, ज्यांच्या कवितेने त्या काळातील तरुण पिढीला वेड लावले, असे विद्रोही कवी म्हणजे नामदेव ढसाळ. विद्रोह हाच ज्यांच्या कवितेचा गाभा होता. शब्दांची धार आणि सत्याचा जळजळीत चटका यांची अनुभूती घ्यायची असेल, तर ती नामदेव ढसाळ यांच्या कवितेतूनच मिळते. जातीभेदाचे चटके ज्यांनी लहानपणापासून तारुण्यापर्यंत सोसले, असे हे बंडखोर कवी.

जन्म आणि बालपणविद्रोही कवी

नामदेव ढसाळ यांचा जन्म १५ फेब्रुवारी १९४९ रोजी खेड तालुक्यातील आम्बेटे गावी झाला. पुढे पोटापाण्यासाठी ते मुंबईला आले. मुंबईत एका खाटिकाकडे त्यांनी नोकरी पत्करली. हे ठिकाण होते मुंबईतील रेडलाइट एरिया म्हणून ओळखले जाणारे कामाठीपुरा.

इथे त्यांना अत्यंत भयंकर जीवन जवळून पाहायला मिळाले. वेश्यांची भांडणे, पोलिसांची दादागिरी, गुन्हेगारी, स्मगलरांचा सुळसुळाट आणि गरिबीचे विदारक वास्तव त्यांनी प्रत्यक्ष अनुभवले. याच वातावरणात त्यांच्या बंडखोर कवितेचा जन्म झाला.

वेगळेपणाची सुरुवात आणि वाचनाचे वेड

त्यांच्या बालपणातील एक गंमत सांगितली जाते. गावात त्यांनी गाडी सुरू केली, तेव्हा लोकांना प्रश्न पडला की एवढ्या गरिबीत या मुलाकडे गाडी आली कुठून? पण या मुलाने चक्क चार कुत्री बांधून गावभर गाडी फिरवली होती. त्याची ही अनोखी गाडी पाहण्यासाठी गावातील लोकांची गर्दी जमली होती.

पुढे त्यांना वाचनाचे वेड लागले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा आणि साहित्याचा त्यांच्या मनावर मोठा प्रभाव पडला. मुंबईचे रस्ते हेच त्यांचे विद्यापीठ होते. या विद्यापीठाने त्यांना समाजातील विषमता, अन्याय आणि शोषण यांचे वास्तव शिकवले. प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध क्रांती घडवण्याची जिद्द त्यांच्या मनात निर्माण झाली.

जातीभेदाचे चटके आणि विद्रोहाची ठिणगी

वयाच्या चौदाव्या-पंधराव्या वर्षी ते एका मुलीच्या प्रेमात पडले. मात्र, जेव्हा मुलीच्या घरच्यांनी तिचे शुद्धीकरण केले, तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला. कारण ते महार जातीचे होते. प्रेमासारख्या नात्यातही जात आडवी येते, हे वास्तव त्यांनी अनुभवले.

एकदा ते ग. दि. माडगूळकर यांच्या भेटीला गेले होते. तिथे माडगूळकरांनी त्यांना जात विचारली. एवढ्या मोठ्या साहित्यिकाच्या मनातही जातीभेदाचे विचार आहेत, हे पाहून त्यांच्या मनात निराशा निर्माण झाली.

शंकराचार्यांचे जातीभेदाला समर्थन करणारे विचार ऐकून त्यांनी त्यांच्या दिशेने चप्पल भिरकावली होती, असेही सांगितले जाते. असा हा अन्यायाविरुद्ध थेट आवाज उठवणारा बंडखोर कवी होता.

दलित पँथरची स्थापना : एका नव्या क्रांतीचा जन्म

दलितांवरील अत्याचार आणि स्त्रियांचे शोषण पाहून नामदेव ढसाळ यांनी १९७२ मध्ये दलित पँथरच्या स्थापनेत पुढाकार घेतला. अमेरिकेतील ब्लॅक पँथर चळवळीपासून प्रेरणा घेऊन ही संघटना उभी राहिली.

नामदेव ढसाळ, राजा ढाले, जे. व्ही. पवार आणि इतर सहकाऱ्यांनी या चळवळीला आकार दिला. दलितांवरील अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी आणि शोषितांना न्याय मिळवून देण्यासाठी हे एक प्रभावी व्यासपीठ ठरले.

राजा ढाले हे त्यांचे मित्र आणि बंडखोर विचारांचे कवी होते. त्यांनी दलित स्त्रियांवरील अत्याचारांबाबत लेखन केले. त्यांच्या विचारांना पाठिंबा देणाऱ्यांमध्ये नामदेव ढसाळ आघाडीवर होते.

गोलपीठ : मराठी कवितेला वास्तवाचा चेहरा

नामदेव ढसाळ यांची कविता नाजूक किंवा केवळ सौंदर्याचा शोध घेणारी नव्हती. त्यांच्या कवितेत सत्याचे उघडेनागडे रूप होते. गरिबी, शोषण, वास्तव आणि मानवी वेदना हे त्यांच्या कवितेचे विषय होते. गरीब, दलित आणि शोषित माणूस हा त्यांच्या कवितेचा नायक होता.

१९७२ साली त्यांचा पहिला काव्यसंग्रह 'गोलपीठ' प्रसिद्ध झाला. या संग्रहातून कामाठीपुऱ्यातील जीवनाचे आणि समाजातील शोषितांचे धगधगते वास्तव मराठी साहित्यविश्वासमोर आले.

दलित स्त्रियांना मिळणारी हीन वागणूक, समाजातील दुटप्पीपणा आणि गरिबांच्या आयुष्यातील वेदना त्यांनी आपल्या कवितेतून मांडल्या. तोपर्यंत मराठी कविता प्रामुख्याने नाजूक भावविश्वाभोवती फिरत होती. मात्र, ढसाळांनी कवितेला वास्तवाचे कठोर रूप दिले.

विजय तेंडुलकर यांनाही त्यांच्या कवितेतील काही शब्दांचे अर्थ विचारावे लागत असत, असे सांगितले जाते. कारण ढसाळांनी जे अनुभवले, जे पाहिले, तेच शब्द त्यांनी आपल्या कवितेत वापरले.

तरुणाईला वेड लावणारा कवी

दलित पँथरचा उद्देशच दलितांवरील अन्यायाला वाचा फोडणे आणि शोषितांच्या दुःखाला आवाज देणे हा होता. या चळवळीत हजारो तरुण सहभागी होऊ लागले. नामदेव ढसाळ यांच्या कविता आणि विचारांनी तरुणाईला अक्षरशः वेड लावले.

Get Premaredkar’s stories in your inbox

Join Medium for free to get updates from this writer.

त्यांचे पुढील काव्यसंग्रहही प्रचंड गाजले. 'गोलपीठ'नंतर 'खेळ', 'तुझी इयत्ता कंची', 'मूर्ख म्हातार्‍याने डोंगर हलवले' असे काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले.

त्या काळातील तरुण पिढी त्यांच्या प्रेमात पडली होती. आजच्या भाषेत सांगायचे तर त्या काळातील Gen Z त्यांच्यावर फिदा होती. त्यांच्या कविता ऐकण्यासाठी आणि त्यांना पाहण्यासाठी तरुणांची गर्दी जमू लागली. त्यांच्या शब्दांमध्ये विद्रोह होता, तर विचारांमध्ये परिवर्तनाची ताकद होती.

स्त्रीस्वातंत्र्य आणि सामाजिक बांधिलकी

नामदेव ढसाळ केवळ जातीभेदाविरुद्ध लढणारे कवी नव्हते, तर स्त्रियांच्या शोषणाविरुद्धही त्यांनी आवाज उठवला. दलित स्त्रियांवरील अत्याचार थांबवण्यासाठी त्यांनी इंदिरा गांधी यांची गाडी अडवली होती. त्याच संदर्भात त्यांनी 'प्रियदर्शिनी' हे काव्य लिहिले.

ते खुलेपणाने टीका करत असत; मात्र दुसऱ्यांचे मोठेपण स्वीकारण्याचा दिलदारपणाही त्यांच्यात होता.

राजकारण, मैत्री आणि पुरस्कार

सामाजिक कार्याच्या निमित्ताने त्यांची बाळासाहेब ठाकरे यांच्याशी ओळख झाली आणि पुढे मैत्रीही निर्माण झाली. बाळासाहेबांना वाचनाची आवड होती आणि ढसाळांचा बंडखोरपणा त्यांना आवडत असे.

नामदेव ढसाळ यांना राज्य सरकारकडून पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यांना सोव्हिएत लँड नेहरू पुरस्कारही मिळाला. त्यांनी 'सामना' वृत्तपत्रात स्तंभलेखनही केले.

त्यांचा विवाह मल्लिका शेख यांच्याशी झाला. त्यांच्या कौटुंबिक आयुष्यातही अनेक चढ-उतार आले.

नात्यांमधील स्वातंत्र्याचा आदर

त्यांचे मावसभाऊ गायकवाड यांनी ढसाळ यांच्या आयुष्यातील काही आठवणी सांगितल्या आहेत. पती-पत्नीमध्ये भांडणे व्हायची; मात्र ती लगेच मिटायचीही. एकदा दोन वर्षांच्या मुलाला सोडून मल्लिका घरातून गेल्या. तेव्हा ढसाळ त्यांना परत आणण्यासाठी गेले नाहीत.

गायकवाड यांनी याबाबत विचारले असता ढसाळ म्हणाले, तिचे स्वातंत्र्य मी मान्य करतो. तिला यायचे असेल तर ती स्वतःच्या इच्छेने येऊ शकते.

मात्र, जेव्हा ढसाळ यांना कर्करोगाने गाठले, तेव्हा त्यांच्या पत्नीने अखेरपर्यंत त्यांची साथ दिली.

आजारपणातही न थांबलेला संघर्ष

नामदेव ढसाळ यांना श्वासनलिकेचा गंभीर आजार झाला होता. गोळ्या घेतल्याशिवाय त्यांना श्वास घेणेही कठीण होत असे. तरीही त्यांनी आपले सामाजिक कार्य थांबवले नाही. अशा परिस्थितीतही त्यांनी मोर्चे काढले, आंदोलने केली आणि अन्यायाविरुद्धचा लढा सुरूच ठेवला.

शरीर साथ देत नसतानाही त्यांच्या मनातील विद्रोहाची आग शांत झाली नव्हती.

दलित पँथरमधील फूट आणि संघटनेचा ऱ्हास

दलित पँथरचे वाढते वर्चस्व पाहून काँग्रेसने या संघटनेशी चर्चा करण्याचे ठरवले. मात्र, सर्व नेत्यांशी एकत्रित चर्चा करण्याऐवजी राजा ढाले यांनी स्वतंत्रपणे बोलणी केल्याने संघटनेत नाराजी निर्माण झाली. नामदेव ढसाळ यांनाही ही बाब आवडली नाही.

नंतर राजा ढाले यांना आपली चूक लक्षात आली आणि त्यांनी काँग्रेसशी बोलणी थांबवली. मात्र, या घटनांमुळे संघटनेतील मतभेद अधिक वाढले.

याच काळात वरळी दंगल उसळली. या संघर्षात एका पँथर कार्यकर्त्याचा मृत्यू झाला. पुढे शिवसेनेनेही या संघर्षात भूमिका घेतली. राजा ढाले यांनी हिंदू देवदेवतांवर केलेल्या टीकेमुळे काही घटक नाराज झाले. या सर्व घडामोडींमुळे दलित पँथरची प्रतिमा आणि संघटनेची एकजूट यांना धक्का बसला.

राजकीय अपयश आणि संघटनात्मक मर्यादा

दलित पँथरच्या संघर्षानंतर नामदेव ढसाळ यांनी निवडणुकीच्या राजकारणातही पाऊल ठेवले. मात्र, त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. घाटकोपरमधून निवडणूक लढवताना त्यांना केवळ १६०० मते मिळाली आणि त्यांचा पराभव झाला.

गायकवाड यांच्या मते, कोणतीही संघटना यशस्वी होण्यासाठी शिस्त आणि मजबूत संघटनात्मक बांधणी आवश्यक असते. दलित पँथरमध्ये या गोष्टींचा अभाव होता. त्यांनी वेळोवेळी ढसाळ यांना हे समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा अवलिया कवी संघटनात्मक पातळीवर काहीसा कमी पडला.

कार्यकर्त्यांना टिकवण्यासाठी आर्थिक साधने आवश्यक असतात. मात्र, त्यासाठी लागणारी मजबूत यंत्रणा दलित पँथरकडे नव्हती. त्यामुळे संघटनेला पुढे अनेक राजकीय आणि संघटनात्मक तडजोडींना सामोरे जावे लागले.कधी काँग्रेसशी हातमिळवणी तर कधी शिवसेनेशी. त्यामुळे या गुणवत्ता असलेली चळवळ फोफावली नाही.

नामदेव ढसाळ हे केवळ कवी नव्हते, तर त्यांनी कवितेला विद्रोहाचे शस्त्र बनवले.

--

--